Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर सिंदखेड राजाजवळ असलेल्या पिंपळखुटा या गावाजवळ पहाटे एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला, या अपघातत 25 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला. मनाला सुन्न करणारी राज्यासह देशभरातील नागरिकांना अस्वस्थ करणारी ही घटना घडली आहे.
बुलढाणा बस अपघात : प्राप्त माहितीनुसार मध्यरात्री दिड ते 2 च्या सुमारास बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकाला धडकून उलटली, त्यानंतर लगेचच बसने पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी 5 प्रवासी व ट्रॅव्हल्सचे 3 कर्मचारी असे आठ जण बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही झाली प्राथमिक माहिती.
Buldhana Bus Accident
मात्र मनाला सुन्न करणाऱ्या आणि प्रत्येक माणसाला अस्वस्थ करणारी ही घटना का घडली ? यातील मृत्यूला जबाबदार कोण ? यातील लोकांचे जीव वाचवता आले नसते का ? अंदाजे 25 लोक जळून मृत्यूमुखी पडेपर्यंत मदत का मिळाली नाही ? आधुनिकतेचा आव आणणारे आपण अजूनही अशा घटनेला रोखण्यात अपयशी आहोत का ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
असे सांगण्यात येत आहे की, टायर फुटल्यामुळे अपघात झाला परंतू खरंच टायर फुटले होते की, ड्रायव्हरला डुलकी लागली होती, ड्रायव्हरचा निष्काळजीपणा तर याला जबाबदार नाही ना ? याचा तपास सुरू आहेच, आणि योग्य दिशेने तपास झाल्यास ते समोर येईल. परंतू अपघात झाल्यानंतर जे अपेक्षित होते ते झाले नाही.
प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्चा अपघात झाल्यानंतर दरवाजा असलेल्या साईडनेच ही ट्रॅव्हल्स उलटली होती, त्यामुळे प्रवाशांना जाण्यास मार्ग नव्हता, आणि काचा न फुटल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही, त्यामुळे मृत्यूची संख्या वाढली. मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी वेळीच मदत केली असती तर अनेकांचा जीव वाचला असता, कारण या वाहनाच्या बाजूने अनेक वाहने गेली परंतू कोणीही मदत केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
जर या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांपैकी कोणी तरी वाहन उभे करून एखाद्या रॉडने किंवा वस्तूने ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या असत्या तर अनेकांना बाहेर पडता आले असते, मात्र संवेदनाशुन्य असलेल्या अनेक लोकांनी वाहने थांबवली नसल्याचे समोर येत आहे.
दूसरी बाब म्हणजे कोणतेही एक्सप्रेसवे असो किंवा सुपर एक्सप्रेस हायवे असो रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रोड सेफ्टीचे नियम असतात, त्या नियमांचे काय झाले. अपघात घडल्यानंतर यंत्रणेकडून तात्काळ मदत का पोहोचली नाही. जवळपास अर्धा ते पाऊण तास मदत न मिळाल्यामुळे एवढ्या निष्पाप लोकांचा नाहक जीव गेला आहे.
एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर आग लागल्यास ती विझवण्यासाठी ज्या प्रमाणे कार्यालयांमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी आग विझवण्याची छोटी सेफ्टी टँक असते त्या प्रमाणे वाहनात का नाही. अपघात झाल्यास अवघ्या 10 मिनिटात यंत्रणा घटनास्थळी पोहोचेल अशी यंत्रणा आपण का निर्माण करू शकलो नाही.
असे म्हटले जाते की, लोकांचा जीव वाचवण्यासाठी शासनाकडे यंत्रणा असते, मग ही यंत्रणा अशा अपघाताच्या वेळी असते कुठे ? जर यामध्ये सगळेच म्हण्णार असतील की आम्ही दोषी नाही तर मग दोषी कोण ? आणि कार्यवाही कोणावर करणार ? असे सवालही सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
कारणे अनेक आहेत, मात्र आपण अनेक निष्पाप लोकांचा जीव वाचवू शकलो नाही हे मोठे दुर्दैव आहे. ज्या लोकांचा जीव गेला आहे त्यांची अवस्था मृत्यूपूर्वी कशी असेल ? जळतांना त्यांना किती त्रास झाला असेल ? नाहक जीव गेलेल्या या लोकांचा काय दोष होता ? त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था असेल ? असे अनेक प्रश्न मनात सारखे घोंगावत आहेत आणि अस्वस्थ करत आहेत.
राज्यकर्त्याना एवढंच म्हणणे आहे की, चकाचक रस्ते, हायवे नक्कीच बनवा पण लोकांचा जीव जाणार नाही अशी यंत्रणा नक्कीच उभारा. विकास नक्कीच व्हायला हवा, परंतू लोकांचा जीव घेणारा आणि सर्वसामान्यांना हतबल करणारा विकास आम्हाला नको आहे. विकासाचे एखादे काम कमी करा पण लोकांचे जीव जाणार नाही अशी अत्यंत जलदगतीने कार्य करणारी यंत्रणा नक्कीच उभारा एवढीच नागरिकांची माफक अपेक्षा आहे…